जळगाव:- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या नसरापूर येथे घडलेल्या घृणास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर या पुढे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पॅरोल देऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकावे, महिला अत्याचाराच्या घटनांसाठी विशेष आणि स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, खरंतर हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. या नराधमाला पॅरोल मिळाला नसता तर त्या चिमुकलीचा जीव वाचला असता.
मला आणखी एक गोष्ट नमूद करायची आहे की येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला, लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतात. प्रत्येक वेळी आपण फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी करतो पण प्रत्यक्षात कोर्टात अनेक खटले न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकावे महिला अत्याचाराच्या घटनांसाठी विशेष आणि स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे ज्याने करून अत्याचारांच्या घटनांची सुनावणीला विलंब होणार नाही तसेच पीडित महिलांना वेळेत न्याय मिळेल असं त्या म्हणाल्या.
