चिपळूण : चिपळूण शहरात वाहन पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसताना वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप करत, प्रथम पार्किंगची व्यवस्था करून त्यानंतरच कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्राईम फ्री वर्ल्ड अँड पीस कौन्सिल या संस्थेने विविध शासकीय विभागांकडे मेलद्वार निवेदन पाठवून केली आहे.
मुख्याधिकारी चिपळूण नगरपरिषद, पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा), जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन), पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. मात्र शहरात आवश्यक त्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.
संस्थेने पत्रानुसार, गेल्या दोन वर्षांपासून पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत पोलिस ठाण्यात बैठकीतही चर्चा झाली असून, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे उपाययोजना करण्याचे मान्य केले होते. मात्र अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात चिंचनाका परिसरातील वाहतूक कोंडीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या ठिकाणी चारही दिशांकडून वाहतूक होत असल्याने वारंवार कोंडी निर्माण होते आणि वाहनधारकांमध्ये वादही होतात. अशा वेळी वाहतूक सुरळीत ठेवण्याऐवजी वाहनांवर दंडात्मक कारवाई आणि आता गुन्हे दाखल करण्यावर भर दिला जात असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
तसेच पानगल्लीसह शहरातील अनेक भागांत फेरीवाले व अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, नगरपरिषदेकडून अधूनमधून अतिक्रमण हटविले जात असले तरी त्यात सातत्य नसल्याने काही वेळातच परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न आणि अतिक्रमण यावर सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या संस्थेने केली आहे.
पार्किंगच्या अभावामुळे नागरिक त्रस्त; दंडात्मक कारवाईऐवजी उपाययोजनांची मागणी..
