दापोली : कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या वतीने दापोली तालुक्यातील कोळथरे परिसरातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी आवश्यक ई केवायसी तसेच प्रधानमंत्री पिकविमा योजनेच्या नोंदणी शिबिराचे आयोजन कोळथरे येथील आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर प्रशालेमध्ये करण्यात आले. शेतकऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला.
कोकणातील आंबा व काजू पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत मिळण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नेटवर्कच्या अडचणी व अन्य तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण झाले नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाच्या सहकार्याने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराला जिल्हा परिषद सदस्य साधना महाजन, कृषी विभागीय अधिकारी मंचरे, जाधव, विद्याधर जोशी, ओंकार कात्रे, कौस्तुभ वैद्य, आदित्य देपोलकर, सिद्धी मयेकर, सुनील पेठे, अमेय हुंबरे, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश नरवणकर, प्रशांत जाधव तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन आदी उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी कोळथरे, पंचनदी, गोमराई, आघारी, उसगाव, बोरिवली आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण करण्याबरोबरच प्रधानमंत्री पिकविमा योजनेबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.