चिपळूण: दिंडोरीप्रणीत अखिलभारतीय श्री. स्वामी सेवाकेंद्र चिपळूणतर्फे शहरातील विरेश्वर मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत उत्साही आणि चैतन्यदायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री. स्वामी समर्थ सारामृताचे १६७ सामूहिक पाठ श्रींच्या चरणी समर्पित करण्यात आले.

चिपळूण सेवाकेंद्रातर्फे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक सेवा नियोजनपूर्वक संपन्न झाला. भूपाळी आरती, श्रींच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक, महानैवेद्य आरती, स्वामीचरित्र सारामृत, सामूहिक पाठ वाचन, महाप्रसाद गुरुपद विधी आणि सामूहिक नामजप असे कार्यक्रम पार पडले. मनवा मयेकर, सुद्धा आणि संदेश लटके, सुचिता आवले, मिलन काणेकर, रेश्मा मोरे या सेवेकऱ्यांना आरतीचा लाभ मिळाला. तर माधव खेडेकर, रामभाऊ कदम या ज्येष्ठ सेवेकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप ठसाळे, तांदळे भाऊ, श्रेया डोळस, ज्योती पालकर, प्रिया खानविलकर या पंचकमिटीने सर्व सेवेकरांच्या मदतीने उत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. दिवसभरात ३५० भाविक सेवेकऱ्यांनी गुरुप्रसाद घेतले.

दुपारी सर्वाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी आरती व प्रसाद वाटप झाल्यावर श्रद्धापूर्वक वातावरणात उत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी विरेश्वर मंदिर व्यवस्थापक कमिटीचे उत्तम सहकार्य लाभले. दर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दिंडोरीप्रणीत विरेश्वर मंदिर चिपळूण या सेवाकेंद्रात साप्ताहिक आरती मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होत असतो.