गुहागर : पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, गुहागर यांच्या पुढाकाराने गुहागर समुद्रकिनारा आणि पोलीस परेड ग्राउंड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध शासकीय अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.
या मोहिमेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर पडलेला प्लास्टिक कचरा, रिकाम्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या. समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासोबतच सागरी पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानेही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून स्वच्छता राखली पाहिजे, असे आवाहन यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे गुहागर तालुकाध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव महेश जामसुतकर, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे शामकांत खातू, अरुण मालप सहभागी झाले होते. तसेच महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे बाबू गुहागरकर, प्रविण रहाटे, कल्पेश बागकर, स्वप्नील राऊत, राहुल जाधव, विलास वाघधरे, रविंद्र बागकर, शुभम भायनाक, कुणाल देसाई, राकेश राऊत, आशिष विचारे, प्रथमेश कदम, प्रसाद बोले, विनायक बारटक्के, केदार मालप, विरेंद्र साळवी, युवराज शिर्के, संगम मोरे, भावेश रोहिलकर, अभिजित गोळे, तेजस कदम यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमातून महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने पर्यावरण संवर्धनाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आणि सदस्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. भविष्यातही अशाच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर पर्यावरण आणि निरोगी समाज हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.