चिपळूण ः खेड तालुक्यातील लोटे पंचक्रोशीच्या जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ लोटे संचलित कविता विनोद सराफ हायस्कूल येथे 2 ऑगस्ट बालरंगभूमी दिन सोहोळा आनंदी रविवार प्रकल्पाखाली आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री आणि बालरंगभूमीच्या भारतातील जनक बालरंगभूमी-लिट्ल थिएटर यांच्या संस्थापिका सुधा करमरकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने बालनाट्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ रंगकर्मी रघुनाथ कासेकर यांनी शाळेतील सुमारे निवडक 50 विद्यार्थ्यांना नाट्य अभिनय विषयक मार्गदर्शन केले. यात नाटकातील विविध नेपथ्य, नाटक प्रकार, नाटकांचा इतिहास, मुद्राभिनय, व्होईस चे कल्चर, शब्दांना भावना व रंगमंच वावर यासारखे अनेक पैलू विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच लहान मुलांच्यासाठी सुधा रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटके लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यांतून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच पण मुलांचे नाटक कसे असावे, याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला. सुधा करमरकरांनी मुंबईतील आपल्या वडिलांच्याच साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने ‘मधुमंजिरी’ हे मराठी रंगभूमीवरील खरेखुरे पहिले बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी ते लिहिले होते. सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रेरणा चव्हाण, शिक्षक विनोद मोहिते, लक्ष्मण लोखंडे, श्वेता शिरगावकर आदि सांस्कृतिक विभागाचे शिक्षक उपस्थित होते. संतोष पडवळ व मनीष घाग यानी आयोजनात विशेष मदत केली.
लोटे येथे भारतीय बालरंगभूमी दिन साजरा ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांच्या आठवणींना उजाळा..
