चिपळूण : चिपळूण शहर व तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून आठ दिवसांच्या आत सर्व खड्डे बुजवावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्षा आरुता आडविलकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, चिपळूण यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण शहर व तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थिनी, नोकरी करणाऱ्या महिला, गृहिणी, शेतकरी, शेतमजूर, उद्योग-व्यवसायात कार्यरत महिला तसेच गर्भवती महिलांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांना बसणाऱ्या तीव्र धक्क्यांचा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कंबरदुखी, पाठीचे विकार, मानदुखी आदी समस्या वाढत आहेत. तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुचाकी अपघातांचे प्रमाणही वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे युद्धपातळीवर बुजवावेत तसेच खराब झालेल्या रस्त्यांची दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आठ दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरुता आडविलकर यांनी दिला आहे.
यावेळी महिला तालुका अध्यक्षा आरूता आडविलकर, तालुका अध्यक्ष अविनाश केळसकर, जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, शहराध्यक्ष रुकार अल्वी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, शहर युवक अध्यक्ष मुन्ना जास्‌‍नाईक, उपशहर अध्यक्ष दीपा कोलतेकर, जिल्हा सदस्य सोनिया लोहिया, सत्येंद्रसिंग लोहिया, पुष्कराज पवार उपस्थित होते