रायगड : सुधागडच्या पाली शहरात यंदाची भारतीय जनता पार्टीची दहीहंडी केवळ उत्सव राहिली नाही, तर ती ठरली थरार, संस्कृती आणि भव्यतेचा संगम! हजारो नागरिकांची उपस्थिती, ढोल-ताशांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी लावलेले उंचच उंच थर… या सगळ्यामुळे पालीचा परिसर अक्षरशः जल्लोषात न्हाऊन निघाला.

प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व भाजप पुरस्कृत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दहीहंडी सोहळ्याने सुधागडच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले होते. या भाजपच्या दहीहंडी उत्सव 2026 वर जोगेश्वरी नागोठणे गोविंदा पथकाने नाव कोरले. तर सुधागड तालुका मर्यादित चषकावर कुंभारआळी गोविंदा पथकाने यशस्वी सात थर लावून 1 लाख 11 हजार 111 चे बक्षीस पटकावले. पाच आणि सहा थराची सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 10 हजार रोख व आकर्षक चषक देऊन गौरविले. यावेळी ओम साई अँकेडमी च्या कलाकारांनी उत्कृष्ट कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

पाली शहरात भाजपच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाला महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी चे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व सुधागड तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना प्रकाशभाऊ देसाई यांनी दहीहंडी व गोपाळकाला सण आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा जतन करणारा सण असल्याचे म्हटले.
दहीहंडीत थर लावणे हे साहस आहे. पण प्रत्येक वर्षी कार्यक्रमाच्या भव्यतेचा थर उंचावत नेणे हे देखील मोठे साहस आहे.
“दहीहंडी म्हणजे फक्त हंडी फोडण्याचा उत्सव नाही; दहीहंडी म्हणजे एकजुटीची ताकद, तरुणाईच्या सामर्थ्याचा उत्सव आणि समाजाला एकत्र आणण्याचं माध्यम आहे.”आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा, क्षमता आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आहे. ही ऊर्जा केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता समाजाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, क्रीडेसाठी आणि आपल्या सुधागडच्या भविष्यासाठी वापरली गेली पाहिजे.
या दहीहंडीच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे—पाली आणि सुधागडच्या तरुणांना एकत्र आणणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे, गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणे आणि आपल्या संस्कृतीची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवणे.
आपण वेगवेगळ्या विचारांचे पुढील वर्षी हा दहीहंडी महोत्सव अधिक भव्य स्वरूपाचा घेऊ, व विजेत्याला 5 लाख 55 हजार 555 चे पारितोषिक देऊ अशी घोषणा प्रकाशभाऊ देसाई यांनी केली.