पुणे : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भुस्सखलनाच्या घटना घडल्या. अनेक रस्ते,ओढ्या,नाल्यांवरील पुल वाहुन गेले. यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. १४ सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेशोत्सवासाठी पुणे – पिंपरी चिंचवड मधून लाखो नागरीक कोकणात जातील.त्यांना जाण्यासाठी ताम्हिणी व भोर वरंधा घाटातील रस्ता सोयीस्कर आहे.परंतू मागील महिन्यातील पावसामुळे या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी व भोर वरंधा घाटातील रस्त्यांची कामे युध्द पातळीवर पुर्ण करावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व कोकण खेड युवाशक्तीचे माजी अध्यक्ष श्री रुपेश मोरे यांनी मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश मोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, पुणे, पिंपरी चिंचवड मधील कोकणवासीयांचे आपल्या मुळगावी कोकणात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीवाडीचे नुकसान झाले आहे. शेत जमिनी वाहून गेल्या असून घरांची पडझड झाली आहे. त्याची डागडूजी करणे देखिल आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुस-या आठवड्यात अनेक नागरीक आपल्या मुळगावी कोकणात जातील.
पुणे – पिंपरी चिंचवड मधिल नागरीकांना कोकणात जाण्यासाठी ताम्हिणी व भोर वरंधा घाटातील रस्ता सोयीस्कर आहे. या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत तसेच रस्ता हा वाहून गेला आहे. तर ज्या भागात रस्ता सिमेंटचा आहे तेथे साईड पट्टीवरील भराव, खडी वाहून गेलेली आहेत. वाढणा-या वाहतुकीमुळे अपघात होण्याची व वाहतूक विस्कळीत होण्याची भिती आहे. यासाठी युध्द पातळीवर रस्ते दुरुस्त करावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश मोरे यांनी केली आहे.