दापोली : गेल्या नऊ वर्षांपासून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविण्यात येणारा ‘व्हिजन दापोली’ हा उपक्रम आता अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यात येणार असून, आधुनिक शेती, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे नवे उपक्रम त्यात समाविष्ट केले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देत हा उपक्रम दापोली तालुक्याच्या शैक्षणिक विकासाचा आदर्श आराखडा ठरेल, अशी ग्वाही पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दापोली येथे दि.३ आॅगस्ट रोजी आयोजित व्हिजन दापोली मुख्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या प्रारंभी व्हिजन दापोलीचे सचिव सुनील कारखेले यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे २०१७-१८ पासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता उंचावणे, पालकांचा शाळांवरील विश्वास दृढ करणे, पालक प्रबोधन, शिक्षक प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी राबविण्यात आलेल्या सात उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सभापती उन्मेष राजे म्हणाले की, “व्हिजन दापोली हा उपक्रम आमच्या कार्यकाळातही अधिक प्रभावीपणे सुरू राहील. मात्र काळाची गरज ओळखून त्यात काही नावीन्यपूर्ण बदल करण्यात येतील. विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत वर्षभर सेंद्रिय पालेभाज्यांची लागवड, शेतीविषयक प्रयोग आणि प्रत्यक्ष कृतीवर आधारित उपक्रम राबविण्यात येतील. बालपणापासूनच विद्यार्थ्यांना शेतीकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असेल.”
पंचायत समिती सदस्य तथा गटनेते निलेश शेठ यांनी शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य देऊन उत्कृष्ट कार्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ज्ञानदात्याने नव्या जोमाने कार्य करण्याची गरज असून, पवित्र शैक्षणिक कार्यात समाजातील सर्व घटकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीच्या प्रारंभी शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तर व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय सिरसाट यांनी आभार मानले.
व्हिजन दापोली ठरणार सर्वांगीण विकासाचा नवा आराखडा; आधुनिक शेतीसह नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेशआवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देणार – सभापती उन्मेष राजे…
