गुहागर : गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिरानजीक तिजना नदीवरील लोखंडी साकव ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी कोसळल्याच्या दुर्घटनेत आठ जनावरे साकवाखाली अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र दिलीप लिंगायत यांच्या मालकीचा एक बैल मृत्युमुखी पडला, तर उर्वरित जनावरे किरकोळ जखमी झाली होती.
दुर्घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी जनावरांवर उपचार केले तसेच मृत बैलाचे शवविच्छेदन पूर्ण केले. या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने अवघ्या १८ तासांत मदत प्रक्रिया पूर्ण केली. मृत बैलाचे मालक दिलीप लिंगायत यांना शासनाच्या नियमानुसार ३२ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. प्रांत आकाश लिगाडे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
