चिपळूण : चिपळूण शहरात आजी-माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वसोयीयुक्त भव्य ‘सैनिक संकुल’ उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे.
चिपळूणसह गुहागर, खेड व संगमेश्वर परिसरात मोठ्या संख्येने माजी सैनिक वास्तव्यास आहेत. मात्र, वैद्यकीय सुविधा, कॅन्टीन तसेच पेन्शन व शासकीय कामांसाठी त्यांना विविध ठिकाणी जावे लागते. त्यामुळे सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे सैनिक संकुल चिपळूणमध्ये उभारणे ही काळाची गरज असल्याचे माजी सैनिकांनी म्हटले आहे.
प्रस्तावित सैनिक संकुलात प्रशस्त सीएसडी कॅन्टीन, ईसीएचएस पॉलिक्लिनिक, माहिती व मदत कक्ष, युवा मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका व वाचनालय, सैनिकांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह तसेच माजी सैनिकांसाठी अल्पदरातील विश्रामगृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संकुलामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील तसेच राज्यातील व देशातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा लाभ होणार आहे. विशेषतः सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या स्थानिक युवक-युवतींना मोफत शारीरिक व लेखी परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सैनिकांनी देशाच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केले असून, त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे चिपळूण येथे सैनिक संकुल उभारण्याच्या मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी समस्त माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय लाक्षणिक उपोषण करतील, असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.