रत्नागिरी :- राज्य शासनाच्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेतून संपूर्णपणे कला आणि साहित्य क्षेत्रावर आपली उपजीविका अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा ५ हजार रुपये मानधन दिले जाते. जिल्ह्यातील पात्र कलाकारांनी १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) तथा सचिव, कलाकार मानधन निवड समिती यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत:
​वयोमर्यादा: उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांगांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता असून त्यांच्यासाठी वयाची अट ४० वर्षे आहे.

​योगदान : कला व साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षे असावे आणि या क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातलेली असावी.

​उत्पन्न : कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच, सध्या किंवा पूर्वी कलाकाराची उपजीविका केवळ कलेवरच अवलंबून असणे आवश्यक आहे.

​प्राधान्य : वयाने ज्येष्ठ असणारे उमेदवार, तसेच विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाईल.

​अटी : उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच, तो केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा.

​आवश्यक कागदपत्रे​अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे
​वयाचा आणि रहिवासी दाखला
​आधार कार्ड
​उत्पन्नाचा दाखला आणि प्रतिज्ञापत्र
​बँक खात्याचा तपशील (बँक खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड)
​पती-पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)
​अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास)
​राज्य किंवा केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)
​नामांकित संस्था किंवा व्यक्तीचे शिफारसपत्र (लागू असल्यास) व इतर विविध पुरावे.