खोपोली : सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वरची खोपोली येथे दरड कोसळून श्री. राघो ढुंगणे यांचे संपूर्ण घर क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. या भीषण दुर्घटनेत श्री. राघो ढुंगणे, त्यांच्या पत्नी सौ. मंगल ढुंगणे आणि मुलगा विजय ढुंगणे हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जाखोटिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेमुळे ढुंगणे कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे. घर पूर्णपणे नष्ट झाल्याने निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, एकाच वेळी तिन्ही जणांच्या उपचाराचा मोठा आर्थिक भार उचलणे त्यांच्या कुटुंबाला शक्य नसल्याचे समजताच खोपोलीचे उपनगराध्यक्ष श्री. विक्रम साबळे यांनी तात्काळ पुढाकार घेत काशी नागरी सहकारी पतपेढी, खोपोली यांच्या सहकार्याने ढुंगणे कुटुंबाला ₹५०,०००/- ची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी उपनगराध्यक्ष श्री. विक्रम साबळे यांनी ढुंगणे कुटुंबीयांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच भविष्यातही आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी डॉ. सतीशजी जाखोटिया, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. काशिनाथ पारठे, काशी नागरी सहकारी पतपेढीचे संचालक श्री. मुस्तुफा दुदूके, ज्येष्ठ नागरिक श्री. शंकरजी पापळ, सामाजिक कार्यकर्ते श्री. विनोद सोलंकी, श्री. विनोद रजपूत, श्री. मोरेश्वर ढुंगणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कठीण प्रसंगी समाजातील विविध घटकांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे ढुंगणे कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला असून, अशा संकटसमयी समाजाने एकजुटीने उभे राहण्याचा प्रेरणादायी संदेश या मदतकार्याद्वारे देण्यात आला.
