दाभोळ : भारतीय जनता पार्टी, दाभोळ पुरस्कृत ए वन जलफायटर आयोजित जिल्हास्तरीय प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत आठ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. तसेच दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी येथील श्री देवी मरीआई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथकाने चार थर रचून दाभोळवासीयांची मने जिंकली.

यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत चिपळूण येथील गोळकोटचे श्री गणेश गोविंदा पथक, जालगाव येथील हिंदू राज प्रतिष्ठान गोविंदा पथक, हर्णे-फणसवाडी येथील नागेश्वर गोविंदा पथक, मंडणगड-भिंगलोली येथील कन्हैया गोविंदा पथक, हर्णे-राजवाडी येथील श्री गजानन गोविंदा पथक, चिपळूण-मार्कंडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक तसेच हर्णे येथील हिंदू एकता गोविंदा पथक यांनी सहभाग घेतला.

याशिवाय दाभोळ कुंभारवाडी येथील नवचैतन्य मित्र मंडळ गोविंदा पथकाने हौशी गटातून पाच थरांची सलामी दिली. तर जालगाव येथील हिंदू राज प्रतिष्ठान गोविंदा पथकाने सात थर रचून दाभोळवासीयांची मने जिंकली.

स्पर्धेदरम्यान चार विजेते पथके निवडण्यात आली. प्रथम क्रमांक चिपळूण-गोळकोट येथील श्री गणेश गोविंदा पथकाने, द्वितीय क्रमांक हर्णे-फणसवाडी येथील नागेश्वर गोविंदा पथकाने, तृतीय क्रमांक हर्णे-राजवाडी येथील श्री गजानन गोविंदा पथकाने, तर चतुर्थ क्रमांक हर्णे येथील हिंदू एकता गोविंदा पथकाने पटकावला.

या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री केदारजी साठे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. स्मिता जावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा रत्नागिरी जिल्हा प्रो गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्री अक्षय पाठक, भाजपा नेते श्री उदय जावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य श्री भाऊ इदाते, भाजपा तालुकाध्यक्षा जया साळवी, भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री सचिन होळबे, भाजपा सरचिटणीस योगेश सुर्वे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. वैशाली इदाते, भाजपा जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित, भाजपा सोशल मीडिया संयोजक बापू लिंगावले, दाभोळ गावच्या सरपंच राखी तोडणकर, उपसरपंच अभय गोयथळे, माजी सरपंच संगीता दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्या समिती भाटकर, तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ए वन जलफायटर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज खडपकर, उपाध्यक्ष ऋषिकेश शिरगावकर, सचिव अथर्व खडपकर, खजिनदार विजय खडपकर, तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनेक दिवस परिश्रम घेऊन हा दिमाखदार कार्यक्रम यशस्वी केला. हा सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला. यावेळी दाभोळ गाव व परिसरातील हजारोंच्या संख्येने गोविंदा रसिक उपस्थित होते.