मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची उत्तर रत्नागिरी विभागीय फेरी बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटीचे दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजने एकूण ११ पारितोषिके पटकावली.
नेहमीप्रमाणे साहित्य विभागात महाविद्यालयाने आपला दबदबा कायम राखत ६ पैकी ६ स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली. वक्तृत्व (गट अ) स्पर्धेत जान्हवी डोंगरे हिने प्रथम तर वक्तृत्व (गट ब) स्पर्धेत साईश्वरी पाटणे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. वादविवाद (गट अ) स्पर्धेत पार्थ सामल व जान्हवी डोंगरे या जोडीने तृतीय तसेच वादविवाद (गट ब) स्पर्धेत पार्थ सामल व रासिका बर्वे या जोडीने द्वितीय क्रमांक मिळविला. कथाकथन (गट अ) स्पर्धेत श्रुती येलवे हिने तृतीय तर कथाकथन (गट ब) स्पर्धेत सफा ए. के. हिने द्वितीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
ललित कला विभागात सिद्धी मार्चंडे हिने व्यंगचित्र (Cartooning) स्पर्धेत उत्तेजनार्थ तर स्थळचित्रकला (On the Spot Painting) स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले.
संगीत विभागात शार्दूल आठल्ये याने मकरंद सोमण यांच्या साथीने तालवाद्य स्पर्धेत तृतीय, आयुष मुलुख याने पाश्चात्य वाद्य एकल स्पर्धेत तृतीय, तर भारतीय समूहगीत स्पर्धेत पार्थ गावडे, शार्दूल आठल्ये, कांचन आंबेकर, दिविज खेडेकर आणि ऋत्वी टिकेकर यांच्या संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या सादरीकरणासाठी आयुष मुलुख, वेदांत साठे, जय जाधव आणि मंथन मुलुख यांनी साथसंगत केली.
या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता, नाट्य विभाग समन्वयक प्रा. अजिंक्य मुलुख, संगीत विभाग समन्वयक प्रा. अनिरुद्ध सुतार, तसेच सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा. विश्वेश जोशी, प्रा. जान्हवी दिवेकर, प्रा. स्वाती देपोलकर, प्रा. सिद्धी साळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, संचालक श्री. रविंद्र कालेकर तसेच प्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
