चिपळूण : वृक्षलागवड, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यासाठी समाजसेवक मा. श्री. विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने आकले येथे आयोजित करण्यात आलेला ‘प्रदूषणमुक्त दीपोत्सव’ आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी आकले येथील गीता मोहिते यांच्या निवासस्थानी, गुरववाडी-बौद्धवाडी मार्गावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यावरणवादी व वन्यजीव अभ्यासक तसेच सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण संस्थेचे विश्वास दत्तात्रय काटदरे आणि अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड व निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे विश्वास काटदरे यांनी सांगितले. सण-उत्सव साजरे करताना प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते सामूहिक दीपप्रज्वलन करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला.

या सोहळ्यात देशसेवेचा गौरव आणि क्रीडा गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. माजी सैनिक संभाजी चव्हाण व सुनील खरात यांचा राष्ट्रसेवेतील योगदानाबद्दल, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शुभम शिंदे यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल, आदित्य जाधव (५ किमी चालणे) आणि श्रुती जोशी (३ किमी चालणे) यांचा क्रीडा यशाबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच युवराज कदम (एमएसएफ सुरक्षा रक्षक) आणि इंडिगो एअरलाईन्समध्ये निवड झाल्याबद्दल आयुष पन्हाळकर यांचाही गौरव करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना शुभम शिंदे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता असून जिद्द, चिकाटी आणि नियमित सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते, असे सांगितले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून खेळ आणि आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्वप्नील शिंदे, राजाराम देवरे, माजी सरपंच संतोष कदम, रणजित पन्हाळकर, प्रकाश कदम, विकास मोहिते, सतीश मोहिते, सोहम घोरपडे, कमल कदम, श्रेया पवार, अंकिता जाधव यांच्यासह आकले व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इकबाल चिपळूणकर, राजेश कोकरे, विजय खरात, प्रसाद वनगे, विवेक जाधव, सतीश गजमल, वैभव मोहिते, आकाश मोहिते, अनिल पिनगे, सचिन पवार आणि सामाजिक विकास ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनासोबतच देशसेवक आणि गुणवंतांचा सन्मान करणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला.