लांजा (गोविंद चव्हाण) : गोवा ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या रस्त्यापासून डाव्या बाजूला असणाऱ्या लांजा येथील कुक्कुटपालन संस्थेच्या नारळ, आंबा व काजूच्या बागेत बिबट्या हा वन्यप्राणी मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास श्री. प्रविण जेधे (कुक्कुटपालन संस्था संचालक, लांजा) यांनी भ्रमणध्वनीवरून दिली.

माहिती मिळताच वनपाल लांजा व वनरक्षक लांजा यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बिबट्या हा वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आला. सदर बिबट्या अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत झाला असावा.

सहाय्यक आयुक्त (पशुवैद्यकीय अधिकारी, लांजा) यांनी तपासणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या डोक्याला व कंबरेला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज नोंदविण्यात आला. त्यानंतर सहाय्यक आयुक्त (पशुवैद्यकीय अधिकारी, लांजा) यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. सदर बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे ६ महिन्यांचा होता.

या घटनेची नोंद करण्यात आली असून आवश्यक कागदपत्रे तयार करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड व परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कार्यवाहीसाठी वन अधिकारी श्री धुळू कोळेकर (वनपाल, लांजा), श्रीमती नमिता कांबळे (वनरक्षक, लांजा) व रेस्क्यू टीम सदस्य अमित लांजेकर यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.