चिपळूण : चिपळूण–कराड मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते शौकत मुकादम यांनी या मार्गावर तब्बल १,२३५ खड्डे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले.मात्र, या कामात साधारण १५ ते २० एमएम आकाराची खडी वापरली जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
याबाबत तक्रार मिळताच अभियंता खुणेकर यांनी शिरगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली.यावेळी संबंधित कंत्राटदाराला बोलावून खड्डे भरण्यासाठी दर्जेदार साहित्याचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.बहादूरशेख नाका ते कुंभार्ली घाटमाथा हा रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे..या मार्गावर एसटी बसेस,अवजड वाहने,खासगी वाहने, रुग्णवाहिका तसेच दुचाकींची मोठी वर्दळ असते. कऱ्हाड, मिरज आदी ठिकाणी उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची वाहतूकही याच मार्गावरून होते. त्यामुळे खड्डे बुजविताना केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता टिकाऊ आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीचा अवलंब करावा.पावसाळ्यात केवळ खडी टाकून खड्डे भरल्यास त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचे अवजड वाहनांची काही वाहतूक झाल्यानंतर खडी बाजूला सरकून पुन्हा खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.