मुंबई : आपली एकजूट… आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नव्या जोमाने आत्मविश्वासाने आणि नव्या निर्धाराने कामाला लागुया…असे आवाहन करतानाच वादळाला पाहून आम्ही आमची गलबते कधी वळवली नाही… संकटाना सामोरे जाताना आम्ही आमची पाऊले कधी रोखली नाही… घड्याळाच्या काट्यांच्या हा प्रवास आता थांबणार नाही संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही असा स्पष्ट इरादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्पष्ट केला.
स्वाभिमानातून आपल्या पक्षाची स्थापना झाली आहे. शरद पवारसाहेब, अजितदादा आदींसह पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांसह ज्ञात – अज्ञात व्यक्तीचे पक्षाच्या जडणघडणीत योगदान आहे. आदरणीय दादा आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात होणारा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सर्वांना लाभला आहे. या महापुरूषांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. आदरणीय दादांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसाच महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहिल असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
