पुणे : हिंदू धर्मातील परंपरेनुसार तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात मुलीला चांदीचे पैजण किंवा जोडवे देण्याची प्रथा आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या संतोष नगर येथील बारणे कुटुंबीयांनी या प्रथेला अनोखा फाटा दिला आहे. त्यांनी आपल्या लाडक्या सून आणि मुलीला प्रत्येकी लाखो रुपये किमतीच्या चांदीच्या भरीव चपला भेट दिल्या आहेत.
यासाठी त्यांनी कोकणे चौकातील रांका ज्वेलर्सकडून विशेष ऑर्डर देऊन चांदीच्या तीन जोड्या तयार करून घेतल्या असून, या अनोख्या आणि मौल्यवान भेटीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या कौतुकास्पद उपक्रमाबाबत बोलताना, आमची मुलगी जशी लक्ष्मी आहे, तशीच सूनही आमच्यासाठी साक्षात लक्ष्मी स्वरूपच आहे, अशी भावूक भावना बारणे कुटुंबीयांनी व्यक्त केली. अधिक मासाचे औचित्य साधून सून आणि मुलीमध्ये कोणताही भेदभाव न करता दोघांनाही समान आनंदाचा ठेवा देण्याच्या उद्देशानेच या चांदीच्या चपला भेट दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. सून आणि मुलीला एकाच मापाने सन्मानित करणाऱ्या बारणे कुटुंबीयांच्या या आदर्श निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिक मासाची अनोखी भेट; सून-मुलीसाठी लाखो रुपयांच्या चांदीच्या चपला
