चिपळूण : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या प्रेरणादायी विचारातून समाजसेवेची परंपरा जोपासत, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, माजी पालकमंत्री तथा आमदार मा. श्री. भास्करराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिद्द मतिमंद शाळा, बहादूर शेख नाका, चिपळूण येथे एसएमएस हॉस्पिटल, चिपळूण, शिव आरोग्य सेना, रत्नागिरी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
या शिबिरामध्ये १२७ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. एसएमएस हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिद्द मतिमंद शाळेचे श्री. सुनील शिंदे (शिंदे सर) यांनी प्रास्ताविक करताना अशा समाजहिताच्या उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने आरोग्यविषयक सेवा देत संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षाचे चिपळूण तालुकाप्रमुख श्री सुभाष जाधव यांनी खूप मुलाचे सहकार्य केले तसेच उपविभाग प्रमुख फैयाज शिरूरकर हेही उपस्थित होते
यावेळी शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक श्री. शशिकांत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. त्यांनी मा. उद्धवसाहेब ठाकरे आणि मा. आमदार भास्करराव जाधव यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेची अखंड प्रेरणा लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
तसेच, जिद्द मतिमंद शाळेसोबत भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून संस्थेच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहण्याचा शब्द त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या कार्येकर मॅडम यांनी एसएमएस हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे, शिव आरोग्य सेना, शिवसेना पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमामुळे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि लाभार्थी यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाचे भाव पाहायला मिळाले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत एसएमएस हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने दिलेले योगदान उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरले.
“समाजसेवा हीच खरी शिवसेवा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराने वाढदिवसाचे औचित्य समाजहिताच्या कार्यातून साजरे करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर निर्माण केला.
उद्धवसाहेब ठाकरे व आमदार भास्करराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिद्द मतिमंद शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न…
