चिपळूण : निवळी येथील शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वाविषयी मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरु पूजनाने करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी गुरुवंदना, श्लोक पठण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत, ज्ञान, संस्कार आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. गुरु हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदरभाव आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली.

हा उपक्रम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद विद्यार्थ्यांनी तसेच कृषीदूत शितल डोहळे वैष्णवी कोकरे मयूरी गावडे सानिका भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.