चिपळूण (प्रतिनिधी):- भाजपा महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी सौ. आदिती अविनाश गुडेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका मंडल अध्यक्ष विनोद भुरण, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते खेर्डी येथील यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल सौ. आदिती गुडेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सौ. गुडेकर यांनी दिली आहे.
भिले गावच्या सौ. आदिती गुडेकर या सरपंच असून गावाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. गावात महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविले आहेत. याचबरोबर राजकीय क्षेत्रात वावरत असतांना भाजप पक्षाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी झटत आहेत. याचीच दखल घेऊन भाजपने सौ. आदिती गुडेकर यांच्यावर भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सौ. आदिती गुडेकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाअध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, चिपळूण पालिकेतील गटनेते व नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष तसेच नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नगरसेविका सौ. वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका सौ. अंजली कदम, खेर्डीच्या सरपंच सुगंधा माळी, माजी सरपंच प्रकाश पाथरूड, बाळा दाते, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
