चिपळूण : बार्कलेज (Barclays) कंपनी, मुंबई यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत तसेच सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या विशेष सहकार्याने सुमन विद्यालय, टेरव येथील इयत्ता आठवीच्या ३२ विद्यार्थ्यांना नुकतेच मोफत शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले.

या शैक्षणिक किटमध्ये दप्तर, आठ वह्या, कंपास बॉक्स तसेच आलेख वहीचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या किट वितरण कार्यक्रमास जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक श्री. निशिकांत मोरे, तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे संचालक श्री. सुधाकर कदम, सुमन विद्यालय, टेरवचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करताना शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून अभ्यासात अधिक प्रगती करण्याचा निर्धार व्यक्त केला. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक किट उपलब्ध करून दिल्याबद्दल बार्कलेज कंपनी तसेच सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विकास कदम, सचिव श्री. योगेश कदम, खजिनदार श्री. अजित कदम तसेच संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

समाजाभिमुख संस्था व उद्योगांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.