चिपळूण : चिपळूण शहरातील खेंड विभागातील श्रद्धास्थान असलेल्या श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिरात यंदाचा आषाढी एकादशी उत्सव शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. तब्बल १२५ वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवानिमित्त श्री देव विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड (ता. चिपळूण) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्सवाच्या कार्यक्रमानुसार सकाळी ७ वाजता अभ्यंगस्नान, विधीवत पूजा आणि महाआरती होणार असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ८ वाजता महाआरती, तर रात्री १० वाजता नवयुवक मित्र मंडळ, खेंड-चिपळूण (कांगणेवाडी) यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या उत्सवानिमित्त श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सर्व भाविकांना प्रेमपूर्वक निमंत्रण दिले असून, श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या जयघोषात आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
