दापोली,:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६३ दापोली विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर विश्वेश्वरय्या सभागृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे होणार आहे.
या शिबिरास उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या अभियानाद्वारे महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या अडचणी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पंचायत समितीचे सभापती, नगराध्यक्ष, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारीही कार्यक्रमास उपस्थित राहतील. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित दाखले, नोंदी, अर्ज, तक्रारी व इतर शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन तसेच तातडीने कार्यवाही करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी दापोली तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.