चिपळूण : चिपळूण शहर-मुरादपूर दिशेने येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे महामंडळाने रेल्वे स्थानकाजवळ स्वतंत्र तिकीट खिडकीची इमारत उभारली होती. काही काळ या खिडकीतून प्रवाशांना रेल्वेची तिकिटे मिळत असल्याने शहरातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली होती. मात्र, कालांतराने ही तिकीट खिडकी बंद करण्यात आली.
कोकण रेल्वे अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती शौकत मुकादम यांनी पर्यायी तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तिकीट खिडकी सुरू करण्यात आली; मात्र काही दिवसांतच ती पुन्हा बंद झाली.तिकीट खिडकी बंद झाल्यानंतर इमारतीचा योग्य वापर व देखभाल न झाल्याने ती सध्या जीर्ण अवस्थेत पोहोचली आहे. पावसाळ्यात या इमारतीत गाढवे आणि कुत्री आश्रय घेत असल्याचे दिसून येत असून, काही परप्रांतीय कामगारही तेथे वास्तव्यास असल्याचे निदर्शनास येत आहे.दरम्यान, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याचा काही भाग चिपळूण नगरपालिकेच्या तर काही भाग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्याने दोन्ही प्रशासनांनी समन्वयाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.बंद तिकीट खिडकी, जीर्ण इमारत आणि खड्डेमय रस्ता यामुळे प्रवाशांची गैरसोय कधी संपणार? असा सवाल उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने तिकीट खिडकी पुन्हा सुरू करून इमारतीची दुरुस्ती व योग्य देखभाल करावी, अशी मागणी होत आहे.
