चिपळूण : शहरातील विविध विकासकामांसह अस्वच्छता, सुरक्षेचा अभाव, वाढती अतिक्रमणे आणि नगरपरिषदेतील मनुष्यबळाच्या ठेक्यावरून आज गुरुवारी झालेल्या चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत तब्बल ३५ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.
आंबेडकर स्मारकाच्या अस्वच्छतेवर संताप
बहादूरशेखनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील अस्वच्छता आणि सुरक्षेच्या प्रश्नावर काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्मारकाच्या स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश पवार यांनी रात्रीच्या वेळी स्मारक परिसरात सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जनतेचा पैसा खर्च होऊनही सुरक्षा नसेल तर त्याचा उपयोग काय?, असा सवाल त्यांनी केला. यावर नगराध्यक्ष सकपाळ यांनी या विषयावर गांभीर्याने निर्णय घेण्याचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
प्रत्येक प्रभागात हायमास्ट; उद्यानांत सोलर दिवे
आरोग्य समिती सभापती शुभम पिसे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत शहरातील प्रत्येक प्रभागात दोन हायमास्ट दिवे तसेच आंबेडकर स्मारकासह विविध उद्यानांमध्ये सोलर दिवे बसविण्यात येणार आहेत. यासाठी ९० टक्के निधी ऊर्जा विभागाचा आणि १० टक्के निधी नगरपरिषदेचा राहणार असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाचे नगरसेवकांनी स्वागत केले.
अतिक्रमणाविरोधात ठोस भूमिका घेण्याची मागणी
शहरातील वाढत्या अतिक्रमणावरही सभेत जोरदार चर्चा झाली. नगरसेवक साजिद सरगुरोह, उदय जुवळे, विकी लवेकर, विकी नरळकर, शुभम पिसे आदींनी अतिक्रमणाच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवून नगरपरिषदेने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या कारवाईला पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका नगरसेवकांनी व्यक्त केली.
महामार्गावरील बॅनरमुळे अपघाताचा धोका
नगरसेवक विकी नरळकर यांनी पॉवर हाऊस येथील महामार्गाच्या डिव्हायडरवर लावण्यात येणाऱ्या बॅनरचा मुद्दा उपस्थित केला. बॅनरमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर नगराध्यक्ष सकपाळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
चिपळूण नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण व वृक्ष संवर्धन समितीचीही स्थापना करण्यात आली. सभेला भाजप गटनेते शशिकांत मोदी यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक, मुख्याधिकारी संजय जाधव व अधिकारी उपस्थित होते.
