रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : रोहा तालुक्यासहित मुरुड व रेवदंडा तसेच आजूबाजूच्या जंगल परिसरात अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री केल्याबद्दल पोलिसांकडून वारंवार कारवाई करण्यात आली. अशा पद्धतीची गुन्हेगारी पार्श्ववभूमि असलेल्या चौघांना रोहा पोलीस निरीक्षकांकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड विभाग यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातून तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत तीन तरुण तर एका वृद्ध इसमाचा समावेश असून या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रोहे तालुक्यातील टिटवी सावरोली येथील आरोपी काशिनाथ बाबू ढेबे (वय ४५ वर्ष ), योगेश साहू झोरे (वय २८ वर्ष वर्षे), मिलिंद दामू झोरे (वय २४ वर्षे) व बाबाराम कोंडू होगाडे (वय ५७ वर्षे ) असे आरोपी व्यक्तींचे नाव असून पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाई मागील पार्श्वभूमी अशा पद्धतीची आहे की, सन २०१९ ते २०२५ या कालावधीत संबंधित आरोपी अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. यापूर्वीही त्यांच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करून त्यांना या बेकायदेशीर धंद्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता.

तयामुळे समाजावर होणारे परिणाम लक्षात घेऊन अवैध दारूधंद्यामुळे परिसरातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहेत. त्याचा विपरीत परिणाम समाजव्यवस्थेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच कौटुंबिक कलह आणि सामाजिक अस्थिरता वाढण्याची शक्यता लक्षात घेता कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.यामुळे रोहा पोलीस स्टेशनच्या वतीने संबंधित आरोपींना रायगड जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश २४ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

यापुढेही रायगड जिल्ह्यात अवैध दारू, गुन्हेगारी कृत्ये किंवा इतर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे रोहा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असून नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे….