चिपळूण (सुनील साळवी) : तालुक्यातील रामपूर येथील जंगलात सापडलेली हाडे एका ५४ वर्षीय व्यक्तीची असून, आर्थिक व्यवहारातून त्याची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह रामपूरच्या जंगलात जाळण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूणचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांनी यशस्वी तपास करून उघडकीस आणला.

याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी मूळचा रामपूर येथील विशाल विजय खोडदेकर (वय वर्ष 28 )आणि मुंबईच्या मालाड येथील जन्नतउन्नीसा जन्नत खान (35 )या दोघांना मोठ्या अटक केली. या दोघानाही न्यायालयाने 6 दिवसाचा पोलीस रिमांड दिला आहे.
या गुन्ह्याची माहिती देताना पोलीस निरीक्षक श्री मेंगडे यांनी सांगितले की, मुंबईच्या मालाड येथील एजाज कुरेशी( ५४ रा. मालाड मुंबई ) या व्यक्तीचा खून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.मयत एजाज याचा मालाड येथे असलेला फ्लॅट जन्नतउन्नीसा या महिलेने चार लाख रुपयांचे हेव्ही डिपॉझिट भरून भाडेतत्त्वावर घेतला होता. भाडे करार संपल्यानंतर एजाज यांनी रूम खाली करून डिपॉझिटचे पैसे देण्याची मागणी केली मात्र तिने पैसे दिले नाहीत आणि रूमही सोडला नाही.घर मालक आपल्याला त्रास देत असल्याचे तिने आपला मित्र विशाल खोडदेकर याच्या कानावर हा प्रकार घातला. तेव्हा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जन्नतउन्नीसा राहत असलेल्या खोलीत विशाल आणि एजाज यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत घरमालक एजाज हे जखमी होऊन मृत्युमुखी पडले.त्यानंतर विशाल आणि जन्नत या दोघांनी मिळून मृत एजाज यांना बॅगेत भरून रामपूर येथे आणले. तेथे संशयित विशाल याची स्वमालकीची जागा असल्यामुळे त्याच जागेत नेऊन मृतदेह जाळला.अशी माहिती श्री मेंगडे यांनी दिली.