चिपळूण : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदेश यशवंत जाधव यांची बी द चेंज फाउंडेशन” आयोजित “महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६”साठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी शिर्डी, महाराष्ट्र येथे करण्यात येणार आहे.
बी द चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष मयुर ढोकचौळे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “सामाजिक व वैद्यकीय कार्य क्षेत्रात आपल्या कौशल्यपूर्ण हातांनी,सातत्यपूर्ण परिश्रमांनी आणि नाविन्यपूर्ण सर्जनशीलतेने आपण जे योगदान दिले आहे, त्याची दखल घेऊनच आपली या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक व्यावसायिकतेसोबत कलात्मक उंचीवर नेण्याचे आपले कार्य अनेकांसाठी आदर्श व प्रेरणास्थान आहे.” निवड झालेल्या मान्यवरांना या सोहळ्यात गिफ्ट, ट्रॉफी, शाल, प्रमाणपत्र, बॅच तसेच पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. फाउंडेशनने आदेश जाधव यांच्या उपस्थितीबद्दल विशेष आग्रह केला असून, आपली उपस्थिती या भव्य आणि गौरवशाली कार्यक्रमासाठी अत्यंत सन्मानाची व प्रेरणादायी ठरणार आहे, असे पत्रात नमूद केले आहे. सामाजिक कार्यातून समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा उद्देश या पुरस्कारामागे आहे.