मंडणगड : मंडणगड तालुक्यातील दहागाव जाधव वाडी येथील घरातील बेडरूममधील कपाटाचा लॉकर उघडून सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. या संदर्भात मंडणगड पोलिस ठाण्यात दिनांक 21 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा मंडणगड पोलिसांनी तातडीने तपास करून संशयित आरोपीस अटक केली असून चोरीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली होती. घटनेतील फिर्यादी रविंद्र विष्णू जाधव (वय ३४) यांच्या घरातील बेडरूममधील कपाटाचा लॉकर उघडून त्यामध्ये ठेवलेले त्यांच्या पत्नी अर्चना जाधव यांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत संशयित पवन संभाजी सुतार (वय २९ मूळ राहणार चांदेवाडी, तालुका आजरा कोल्हापूर ) यास मुंबई येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
संशयित आरोपीस २२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे ६४.४८ ग्रॅम वजनाचे व अंदाजे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहेत. लवकरच ते फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांनी सांगितले.
ही कारवाई रत्नागिरी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आर. आर. केंद्रे व पोलिस पथकांनी केली. पुढील तपास मंडणगड पोलिस करीत आहेत.
दहागाव येथील ८.४० लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी प्रकरणीपोलिसांची कारवाई; संशयित आरोपीस अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत..
