जळगाव:- पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर आणि सध्याच्या परिस्थितीवरून लोकांमध्ये वाढणाऱ्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला आवाहन केले आहे. देशातील नागरिकांना खरं सांगा संकट काय आहे, प्रत्येक वेळी झोळी घेऊन परदेशी निघून जाण्याला काय अर्थ आहे ? असं त्या म्हणाल्या आहेत.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून देऊळगाव राजा व्हिडिओ पोस्ट केला आहे. देऊळगाव राजा येथे लोकांना पेट्रोल डिझेलसाठी १२-१२ तास रांगेत उभे रहावे लागले आहे. यावरून खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, माझी राज्यकर्त्यांनी नम्र विनंती आहे, कधी बुलेट वापरायची, कधी ईव्ही कार वापरायची, कधी खुळ्यागत टांगा वापरायचा हे सगळे पीआर स्टंट बंद करा आणि देशातील नागरिकांना सांगा की नेमकं संकट काय आहे ? नागरिकांना सांगा, पेट्रोल डिझेल कधी मिळणार आहे ? त्यांना सांगा, आणखी किती महागाईचा सामना करावा लागणार आहे ? लॉकडाऊनच्या ज्या अफवा आहे त्याबाबत सत्य परिस्थिती काय आहे ते सांगा ? एकदा तुम्ही जनतेच्या समोर येऊन सांगा की तुम्ही नापास झाला आहात, नाकर्ते ठरला आहात !