चिपळूण : सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा यांचा प्रत्यय देणारा एकात्मतेचा संदेश ईद-उल-फितरच्या निमित्ताने चिपळूणमध्ये पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मापारी मोहल्ला मस्जिद (प्रभाग क्र. ४) येथे ईदच्या नमाज पठनानंतर मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन रमजान ईदच्या पवित्र आणि आनंददायी पर्वाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या उपक्रमातून सणांच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, प्रेम, एकात्मता आणि सौहार्द वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. “ईदचा हा सण केवळ धार्मिक उत्सव नसून, समाजाला जोडणारा आणि मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवणारा आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी नगरसेवक अजय भालेकर, वैशाली कदम, संजय गोताड, युवसेना चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे तसेच प्रसाद म्हापुस्कर, लावेश म्हापुस्कर, सुरेश पाथरे, विलास चिपळूणकर, संदिप मनोरकर, प्रकाश साडविलकर, परिमल साडविलकर, गणेश गांधी, सचिन लकेश्री आणि पंकज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची परंपरा जपणाऱ्या अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर ऐक्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.