मुंबई :सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या फेसबुक पोस्टवर कथित अशोभनीय व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी डॉ. सचिनकुमार शिवाजीराव शेळके यांच्याविरुद्ध सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लाघ्य टिप्पण्या करून महिलांचा अवमान करणा-या शेळकेला तात्काळ बेड्या ठोका, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.
प्राप्त प्रथम माहिती अहवालानुसार, खासदार प्रणिती शिंदे यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.०४ वाजता फेसबुकवर राजकीय विषयावरील एक पोस्ट केली होती. या पोस्टवर १६ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता डॉ. सचिनकुमार शेळके याने महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचविणारी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली. याप्रकरणी इस्लामपूर येथील अॅड. मनीषा चंद्रकांत रोटे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.संबंधित फेसबुक टिप्पणीमुळे महिलेच्या विनयशीलतेचा अपमान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, टिप्पणीचे स्क्रीनशॉटही पोलिसांना सादर करण्यात आले आहेत.
या तक्रारीची दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ०४१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ७९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
महिला सन्मानाचा मुद्दा…
सोशल मीडियावरील राजकीय टीका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. राजकीय मतभेद व्यक्त करताना महिलांविषयी आक्षेपार्ह व अशोभनीय भाषा वापरण्याच्या आरोपींना कायदेशीरदृष्ट्या गांभीर्याने घेतले जाईल, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिला आहे.