खेड : – कोट्यवधी रुपये खर्चुन मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले. प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कशेडी घाट ते लोटे हा सुमारे ३० किलोमीटरचा टप्पा आता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. अवघ्या नऊ महिन्यांत या मार्गावर तब्बल ४० अपघातांची नोंद झाली असून १२ जणांना जीव गमवावा लागला, तर ३० हून अधिक जण जायबंदी झाले आहेत. तरीही प्रशासनाची यंत्रणा जागी होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
कशेडी ते लोटे महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. अवघ्यानऊ महिन्यांत या मार्गावर ४० अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. महामार्गावरील चार ‘ब्लॅक स्पॉट’वर ठोस सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले..
- कशेडी बोगद्यात पाणी, अंधार अन् निसरडा रस्ता
कशेडी बोगद्यातून वाहतूक वेगवान झाली असली तरी पावसाळ्यात बोगद्याच्या अंतर्भागात पाण्याचे पाट वाहणे, गळती होणे आणि रस्ता निसरडा होणे यामुळे वाहनचालकांसमोर मोठा धोका निर्माण होतो. प्रकाशव्यवस्था आणि घसरणरोधक सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी बोगद्यातील मोठ्या प्रमाणातील दिवे बंद असल्याचेही समोर आले होते. - खवटीच्या तीव्र वळणावर फलकच नाहीत !
खवटी येथील रेल्वे पुलाजवळील तीव्र वळण अपघातप्रवण बनले आहे. या ठिकाणी आवश्यक दिशादर्शक फलक, ब्लिंकर आणि इतर सावधगिरीच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने वाहनचालकांना अचानक वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. - जगबुडी पुलावर कंटेनर नदीपात्रात; तरीही प्रशासनाला जाग नाही !
जुलै आणि ऑगस्टमध्ये जगबुडी पुलावर नियंत्रण सुटलेले अवजड कंटेनर थेट नदीपात्रात कोसळल्याच्या घटना घडल्या. या घटनांनंतर तरी प्रशासनाने धडा घेणे अपेक्षित होते. मात्र धोकादायक ठिकाणी मजबूत क्रॅश बॅरिअर्स उभारण्याचे काम अद्याप झालेले नाही. एखादा मोठा जीवघेणा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करण्याची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. - आता आश्वासने नकोत; प्रत्यक्ष सुरक्षा उपाय हवेत !
गणेशोत्सव असो, दिवाळी असो, शिमगोत्सव असो किंवा कोकणवासीयांचा दैनंदिन प्रवास – या महामार्गावरील प्रवास रक्तरंजित होणे थांबणे गरजेचे आहे. नऊ महिन्यांत १२ जणांचा बळी आणि ३० हून अधिक जखमी ही आकडेवारी प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे कशेडी ते लोटे या संपूर्ण टप्प्याचे तातडीने सेफ्टी ऑडिट करून सर्व ‘ब्लॅक स्पॉट’वर शास्त्रोक्त सुरक्षा उपाययोजना, क्रॅश बॅरिअर्स, दिशादर्शक फलक, ब्लिंकर, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि घसरणरोधक उपाय तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता पाहणी, बैठका आणि आश्वासनांचा फार्स नको; वाहनचालकांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.
