महाड (मनोज खांबे) :किल्ले रायगडावरील प्रसिद्ध टकमक टोकावरून एका ३७ वर्षीय तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुयोग पांचाळ (वय ३७, रा. वागळे इस्टेट, ठाणे; मूळ गाव खेड, जिल्हा रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. काल रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नसून, अंधारामुळे शोधमोहीम तात्पुरती थांबविण्यात आली होती.आज पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुयोग पांचाळ याने काल सकाळी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आपली गाडी पार्क केली आणि पायऱ्यांच्या मार्गाने किल्ल्यावर प्रवेश केला. त्यानंतर त्याने टकमक टोकावरील काही छायाचित्रे आपल्या पत्नीला पाठवली. तसेच, आपण जीवन संपवत असल्याचा संदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून त्याचा मोबाइल फोन बंद झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
यानंतर सुयोग याचा भाऊ त्याचा शोध घेण्यासाठी रायगड किल्ल्यावर गेला. मात्र, बराच शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने तो खाली उतरला. दरम्यान, किल्ल्याच्या परिसरात पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. यावेळी सुयोगच्या भावाने पोलिसांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. मात्र, शनिवारी सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.

आज सकाळपासून पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने सुयोग पांचाळ याचा पुन्हा शोध घेण्यात येत आहे अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत नेवासे यांनी दिली.
या घटनेमुळे किल्ले रायगड परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, तरुणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेबाबत पुढील माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.