मुंबई : ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘विकसित भारत @२०४७’ या संकल्पनेअंतर्गत भाजपा मुंबईच्या वतीने आज (रविवार, दि. ४ ऑक्टोबर) ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा मुंबईचे अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या विशेष दौऱ्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींना मुंबईतील विविध विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेता येणार आहे. सकाळी १० वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी येथून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यासोबतच मुंबईच्या विकासाचा प्रवास नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रमुख पायाभूत सुविधा आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी या दौऱ्यात करण्यात येणार असून, मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर तसेच अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती सहभागी प्रतिनिधींना देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या विविध विकासकामांचा प्रवास सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दौऱ्याचा वरळी प्रोमेनेड येथे समारोप होणार असून, त्यानंतर भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्यासोबत विशेष टॉक शो आणि संवाद आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील विकासकामे, त्यांचा नागरिकांना होणारा लाभ तसेच मुंबईच्या विकासाच्या भविष्यातील दिशेबाबत यावेळी संवाद साधला जाणार आहे. ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘विकसित भारत @२०४७’च्या दिशेने मुंबईच्या विकासाची वाटचाल प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.