मंडणगड : लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. १४ व १७ वर्षांखालील मुले-मुलींच्या गटांत विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी प्रशालेचा नावलौकिक उंचावला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे दहागाव परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
१४ वर्षांखालील गटात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
१४ वर्षांखालील गटात ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तनिष करावडे याने तृतीय, तर रुही मालुसरे हिने प्रथम क्रमांक मिळविला. लांब उडीत समृद्धी जाधव हिने द्वितीय, तर अनुश्री जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला. गोळाफेकमध्ये समृद्धी जाधव हिने तृतीय, तर थाळीफेकमध्ये पौर्णिमा जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या रिले स्पर्धेत अनुश्री जाधव, समृद्धी जाधव, पौर्णिमा जाधव व पलक पवार या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. मुलांच्या रिले स्पर्धेत ओम रहाटे, तनिष करावडे, सोहम भुवड, श्रवण अष्टमकर व हर्ष जोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. हर्डल्स स्पर्धेत यश शिगवण व पौर्णिमा जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील गटात पदकांची लयलूट
१७ वर्षांखालील गटात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.
धावण्याच्या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावण्यात रेवा होडबे हिने द्वितीय, तर रिद्धी पडवळकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावण्यात प्रांजल लोखंडे हिने प्रथम, तर ८०० मीटर धावण्यात काव्या जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला. १५०० मीटर धावण्यात अनुष्का सेविलकर हिने तृतीय, तर ३००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत रिया मोरे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
हर्डल्स स्पर्धेत प्रांजल लोखंडे व रुद्र सुखदरे यांनी प्रथम, तर आदित्य मोगरे याने द्वितीय क्रमांक मिळविला. उंच उडीत यश देवळे याने प्रथम, तर रेवा होडबे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. लांब उडीत यश देवळे याने प्रथम, तर रिद्धी पडवळकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
तिहेरी उडीमध्ये रेवा होडबे हिने प्रथम, रुद्र सुखदरे याने द्वितीय, तर साहिल जाधव याने तृतीय क्रमांक मिळविला. हातोडाफेकमध्ये आयुष देवरुखकर याने द्वितीय, तर भालाफेकमध्ये रेवा होडबे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
सांघिक स्पर्धांमध्येही यश
१०० बाय ४ रिले स्पर्धेत यश पांढरे, आदित्य मोगरे, रुद्र सुखदरे, साहिल जाधव व श्रेयस सोविलकर यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. ४ बाय ४०० रिले स्पर्धेत अंश सोविलकर, विराज मात्रकर, तन्मय तांबटकर, ओम लोखंडे व श्रवण तांबटकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशालेचे क्रीडा शिक्षक मनोज चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक विजय खाडे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व प्रशालेचे परिसरातून कौतुक होत आहे.
लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागावचे तालप्रतिनिधी मैदानी क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश!
