पुणे : राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार झाले आहे, त्यामध्ये लोककलांचा विचार करण्यात आला आहेच. त्याचा अभ्यास करुन अजूनही काही बाबिंचा समावेश करणे, लोककलांना अधिकचे प्रोत्साहन देणे, जतन संवर्धनाला बळकटीकरण व्हावे, यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे केले.

पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलावंतानी पुण्यातील मोती बाग येथे मंत्री शेलार यांची भेट घेतली. या संवाद कार्यक्रमात रघुवीर खेडकर यांनी यावेळी शासनाकडे लोककलावंताच्या मागण्या मांडल्या. यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश अवलगावकर,समरसता गतीविधी अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. रमेश पांडव आणि कलावंत उपस्थित होते.

यावेळी कलावंतांशी संवाद साधताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, आज डिजिटलचे युग असून जगभरातील दर्शकांना व पुढच्या पिढीला ज्ञात व्हाव्यात म्हणून लोककलांचे डिजिटल संग्रहालय, दस्तावेजीकरण, जतन आणि पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा उपक्रम आपण तातडीने सुरू करू. शासनाच्या विविध जनजागृती आणि प्रचार-प्रसार योजनांमध्ये स्थानिक लोककलावंतांना प्राधान्य दिले पाहिजे. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास किंवा शासनाच्या विविध योजनांचा प्रचार असो, या सर्व ठिकाणी लोककलावंतांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आवश्यक शासन निर्णय तातडीने काढण्याची कार्यवाही आपण करू, असेही त्यांनी आश्वस्त केले. शासनाच्या दृष्टीने लोककलावंत आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य अधिक महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शासन सकारात्मक भूमिका घेऊन पुढेही ठोस निर्णय घेत राहील, याची मी आपणास ग्वाही देतो. दरम्यान, यावेळी लोक कलावंताच्या अनुदानात दुप्पटीने वाढ केल्याबद्दल उपस्थितीत कलाकारांनी शासनाचे आभार मानले.