मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय पक्ष घेतो आणि अधिकृतपणे पक्षच जाहीर करत असतो आणि टीव्हीच्या स्क्रीनवर आलेली प्रत्येक “सूत्रांची बातमी” हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ठराव होत नाही म्हणून माध्यमांनी बातम्या जरूर कराव्यात, प्रश्न जरूर विचारावेत, आमच्यावर टीकाही जरूर करावी; पण कृपया अनधिकृत चर्चेला पक्षाचा अधिकृत निर्णय म्हणून सादर करू नये अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

गेल्या काही तासांपासून काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये “आपल्या वहिनी आहेत ना” या कथित टॅगलाईनखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे “रिलाँचिंग” करणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. माध्यमांनी सूत्रांच्या आधारे मिळालेली माहिती प्रसिद्ध करणे हा त्यांचा अधिकार आहे; मात्र सूत्रांच्या आधारे मिळालेली माहिती आणि पक्षाचा अधिकृत निर्णय या दोन पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत हेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

“रिलाँचिंग”चा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या अधिकृत बैठकीत झाला? ‘आपल्या वहिनी आहेत ना’ ही अधिकृत टॅगलाईन असल्याची घोषणा पक्षाच्या कोणत्या अधिकृत पदाधिकाऱ्याने केली? यासंदर्भात पक्षाची अधिकृत प्रेस नोट कुठे आहे?
आणि प्रशांत किशोर यांनीच हे संपूर्ण अभियान आखले असल्याचे पक्षाने अधिकृतपणे कुठे सांगितले आहे? असे प्रश्न उमेश पाटील यांनी माध्यमांना केले आहेत.

यापैकी कोणत्याही प्रश्नाचे अधिकृत उत्तर उपलब्ध नसेल, तर चर्चेत असलेल्या किंवा कुणीतरी सुचवलेल्या एखाद्या कल्पनेला पक्षाचा अंतिम निर्णय म्हणून महाराष्ट्रासमोर मांडणे योग्य नाही असेही उमेश पाटील यांनी माध्यमांना सुनावले आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुनेत्रावहिनींचे “रिलाँचिंग” करण्याचा प्रश्नच कुठे येतो? ज्या नेत्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शासनात सक्रिय आहेत, ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संघटनेचे नेतृत्व करत आहेत, कार्यकर्त्यांना भेटत आहेत आणि पक्षाचे काम पाहत आहेत, त्या राजकारणातून गायब कधी झाल्या होत्या की त्यांचे आता “रिलाँचिंग” करावे लागेल? असा प्रश्नही उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला आहे.