महाड : महाड तालुक्यातील महाड शहर, महाड तालुका आणि महाड एमआयडीसी या तीन पोलीस ठाण्यांच्या गणपती बाप्पांचे शनिवारी वाजतगाजत आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. वर्षभर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी यावेळी आपला ताणतणाव बाजूला ठेवत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नृत्य करून आनंद व्यक्त केला. अधिकारी आणि महिला-पुरुष पोलीस कर्मचारी बँजोच्या तालावर ठेका धरताना दिसून आले.

अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर शनिवारी महाड तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये विराजमान असलेल्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. वर्षभर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांनाही भावना आहेत, आनंदाचे क्षण अनुभवण्याची त्यांनाही संधी असते, याचा प्रत्यय या विसर्जन मिरवणुकांमधून आला.

महाड शहर पोलीस ठाण्याच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच महिला व पुरुष पोलीस कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. बँजोच्या तालावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनसोक्त नृत्य करत बाप्पाला निरोप दिला.

महाड तालुका पोलीस ठाणे शहरातच असल्याने त्यांच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूकही महाड शहरातून काढण्यात आली. पोलीस निरीक्षक अभिजीत नेवसे यांच्यासह पोलीस अधिकारी, महिला व पुरुष कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. बँजोच्या तालावर नाचत पोलिसांनी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गणपती बाप्पाचीही वाजतगाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि महिला-पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बँजोच्या तालावर ठेका धरत पोलिसांनी आनंदोत्सव साजरा केला.

महाड तालुक्यातील या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. भक्ती, उत्साह आणि पोलिसांच्या आनंदी सहभागामुळे या विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.