मंडणगड : अनुसूचित जाती व नवबौद्ध जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा यांनी पुढाकार घेतला या मोहीमे अंर्तगत महामंत्री अभिजीत देवळेकर यांनी नुकताच गोठे येथे कार्यक्रम घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोर्चा चे मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागर या पाच तालुक्यांत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी, शेततळे अस्तरीकरण, ठिबक व तुषार सिंचनासाठी शासकीय अनुदान उपलब्ध होते. मोहिमेचा शुभारंभ मंडणगड तालुक्यातील गोठे सिद्धार्थनगर येथे करण्यात आला. यावेळी श्री. देवळेकर यांनी शेतकरी महिलांशी संवाद साधून योजनेची माहिती दिली तसेच पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले.
केवळ जनजागृती न करता पात्र लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी अपर्णा जाधव, स्वप्नाली जाधव, सुवर्णा जाधव, देवेश जाधव व निलेश जाधव उपस्थित होते. योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते यांनी या निमीत्ताने केले आहे.
कृषी स्वावलंबन योजनेसाठी भाजपा अनुसचित जाती जिल्हा मोर्चाचा पुढाकार; उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांत जनजागृती मोहीम राबविणार…
