मंडणगड : मंडणगड तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागीने घेऊन पोबारा केलेल्या चंद्रकांत तेरवणकर याच्या मुसक्या आवळून मंडणगड पोलीसांना त्यास मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यासाठी मंडणगड पोलीसांनी रात्रंदिवस सुमारे अडीच हजार किलोमीटर हून अधिकचा प्रवास करुन सापळा रचून ही कामगीरी केली. 10 मार्च 2026 रोजी चंद्रकांत तेरवणकर राहणार आंबळे ता चिपळूण याचे विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात सोन्याचे दागीने लंपास केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या संदर्भात पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांनी दिलेल्या माहीतीनुसार पोलीस स्थानकात गून्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यासंदर्भात तपास करण्यास सुरुवात केली. पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सुचनेनुसार मंडणगड पोलीस ठाण्याची टिम पुण्याकडे रवाना झाली. मोबाईल लोकेशन, ट्रेसींग, तांत्रीक माहीती व पोलीसांचे माहीतीचे स्त्रोत वापरुन आरोपी पर्यंत जाण्यासाठी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी कंबर कसली पुणे, नाशिक, मालेगाव, अहिल्यानंगर, धुळे, इत्यादी ठिकाणे तीन दिवसात पिंजून काढली मात्र चंद्रकांत हा सराईतपणे पोलीसांना गुंगारा देण्याचे काम करीत होता. त्यासाठी त्याने अनेक सिम व ठिकाणे बदलली त्यामुळे मोबाईल लोकेशन वरुन त्याचे लोकेशन मिळण्यास येणाऱ्या अडचणीवर मात करीत अतिशय थरारक पध्दतीने पुणे येथील ग्रामिण भागात लपून बसलेल्या चंद्रकांत याचेपर्यंत पोहचण्यास पोलीसांना यश मिळाले. त्या ठिकाणी पोलीसी सापळा रचून चंद्रकांत याला त्याने चोरुन नेलेल्या 2 लाख 71 हजार 100 रुपयांचे मुद्देमालासह नाट्यमय रित्या ताब्यात घेण्यास पोलीसांनी यश मिळवले. चंद्रकांत याने अशाच प्रकारचे गुन्हे यापुर्वी केल्याची व जुन्या गुन्ह्यास त्यास शिक्षा झाल्याची माहीती पोलीसांकडून कळली आहे. आरोपीत हा महिलांचा विश्वास संपादीत करुन अशा प्रकारचे कृत्य करीत आल्याचे पोलीसांचे निदर्शनास आले आहे. ग्रामिण भागातील महिलांना चांगल्या पगाराची नोकरी देतो असे सांगून त्यासाठी त्याने पस्तीस महिलांच्या दाभट येथे मुलाखत घेतलेल्या असल्याची माहीती या निमीत्ताने पुढे आली आहे. मंडणगड पोलीस स्थानकात 10 मार्च 2026 रोजी याच परिसरातून लापता असलेल्या युवतीच्या लापता असण्यात या आरोपीचा काही संबंध आहे का असा संशय आल्याने पोलीस त्या संदर्भातही तपास करीत होते. युवतीचा लापता होण्यात याच आरोपीतांचा हात असल्याचे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले असून लापता असलेल्या युवतीस सुखरुप परत आणण्यातही फार मोठे यश मंडणगड पोलीसांना आले आहे. सराईत आरोपीने या युवतीस नोकरीचे अमिष दाखवून पुणे येथे स्वतःहा सोबत बंदीस्त करुन ठेवलेले असल्याचे तपासाअंती पुढे आले आहे. दरम्यान आरोपीत यास न्यायालयाचे 18 मार्च 2026 अखेर पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहीती पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्याकडून मिळाली आहे. या संपुर्ण कामगिरीत पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुहास मांडवकर, धनजंय सावंत, मोहन देसाई, पोलीस कॉन्स्टेबल वैशाली चव्हाण, गुप्त वार्ता विभागाचे विनय पाटील हे सहभागी झाले होते त्यांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहेत.
फोटो ओळी
आरोपी चंद्रकांत तेरवणकर यांच्या समवेत पोलीस निरिक्षक नितीन गवारे व सहभागी पोलीस कर्मचारी
अडीच हजार किलोमीटर इतक्या लांबीचा दिवस रात्र प्रवास करुन मंडणगड पोलीसांनी आवळल्या सराईत आरोपीच्या मुसक्या
