मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी उद्योग, गुंतवणूक व सेवा, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी प्रकल्प संचालक, तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांना निर्देश दिले होते. त्यानुसार प्रमोद नाईक, प्रकल्प संचालक, तंत्रशिक्षण यांनी तसे आदेश काढले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या सवलती लागू होणार आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ०५ जून २०२६ च्या शासन निर्णयान्वये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने दि. ०३ सप्टेंबर २०२६ रोजी पत्र काढले आहे. त्यात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयांचे सहसंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (लोणेरे) आणि सी.ओ.ई.पी. तंत्रज्ञान विद्यापीठ (पुणे) यांचे कुलसचिव यांना संबंधित महाविद्यालयांना कार्यवाहीच्या सूचना देण्यास आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यास सांगितले आहे.
या आदेशानुसार सी.ओ.ई.पी. तंत्रज्ञान विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सुधारित शुल्क रचना जाहीर केली आहे. त्यात वैध नॉन-क्रीमी लेयर (NCL) प्रमाणपत्र असलेल्या SEBC विद्यार्थ्यांना शुल्कात मोठी सवलत मिळणार आहे. उदाहरणार्थ, एम.टेक. (डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग) अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या वेळी देय एकूण शुल्क ₹५०,०१४ इतके असेल, तर खुल्या प्रवर्गासाठी ते ₹३,००,०४० आहे. एम.टेक. व एम.प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी हेच शुल्क ₹२५,९९४ असेल, तर खुल्या प्रवर्गासाठी ₹१,१५,८९० आहे.
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणताही आर्थिक अडथळा येऊ नये, ही शासनाची भूमिका आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व सवलती त्यांना मिळाव्यात यासाठी मी संबंधित विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार आदेश निघाले असून या निर्णयाचा लाभ राज्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना होईल.”
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्गीयांप्रमाणेच शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा
