मुंबई : अमेरिकेतील एका उद्योगपतीची तरफदारी करणे ही राहुल गांधी यांची बेईमानी आहे, अशी टीका करतानाच विरोधकांचे सुरू असलेले आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.
एलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेचे समर्थन करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत सरकारवर टीका केली होती. याबाबत आज मंत्री ॲड. आशिष शेलार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. मात्र, आपण प्रश्न विचारला म्हणून सांगतो की, राहुल गांधी ज्या उद्योगपतीची तरफदारी करीत आहेत, ती बेईमानी आहे. एकीकडे भारतातील इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिका निर्बंध लादत आहे. हे पाहता अमेरिकेत काम करणाऱ्या आपल्या भारतीय तरुणांच्या करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने हे पोषक नाही. अशा वेळी राहुल गांधी यांनी अमेरिकन कंपनीची वकिली करणे ही बेईमानी आहे.”
“आपल्या व्यवस्थांबाबत एलॉन मस्क किंवा स्टारलिंक यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सुरक्षा पडताळणीच्या नियमावलीसंदर्भातील काम सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार किंवा संबंधित अधिकारी निर्णय घेतील. मात्र, त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका प्रतिक्रियेच्या बाजूने बोलणे म्हणजे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेशी बेईमानी करण्यासारखे आहे,” असेही शेलार म्हणाले.
“स्टारलिंकच्या मागण्यांबाबत महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जे अयोग्य असेल, ते सरकार करणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. जिओ किंवा अंबानी यांचा उल्लेख केला जात असल्याने सांगतो की, भारताच्या भविष्यासाठी जे योग्य आहे, त्याचाच विचार करून, कोणतीही कंपनी असली तरी सरकार योग्य निर्णय घेईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिल्लीत विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना ॲड. शेलार म्हणाले की, “हे आंदोलन देशातील व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित करणारे असून, ते अराजकतेचे व्याकरण आहे. लोकसभेत याबाबत बोलण्याची संधी आहे. राज्यघटनेने दिलेले लोकसभेचे व्यासपीठ सर्व प्रश्न मांडण्यासाठी उपलब्ध असताना तिथे बोलायला तयार नाहीत आणि सभागृहाबाहेर येऊन अराजकता माजवत आहेत.”
अभिजित दीपके यांनी देशात आता आणीबाणी लागू असल्याचे म्हटले असेल, तर त्यांचे नागरिकशास्त्र कच्चे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. “ज्या काँग्रेससोबत ते आहेत, त्यांनाच आणीबाणी काय असते, हे विचारावे. आणीबाणी म्हणजे काय, हे अभिजित दीपके यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये. काँग्रेसच्या काळात काय घडले होते, कोणाला बोलण्याची आणि लिहिण्याची मुभा होती, हे त्यांनी एकदा काँग्रेसलाच विचारावे,” असे ते म्हणाले.
सीजेपीचे आंदोलन हा काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही ॲड. आशिष शेलार यांनी केली.