देवरुख : मार्लेश्वर येथे घडलेली दुर्घटना ही दुर्दैवीच आहे. या घटनेनंतर मी स्वतः जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रीतसर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच, मार्लेश्वर पर्यटनस्थळी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीसाठी अधिवेशनाच्या कालावधीत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मार्लेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला भेट देण्यापूर्वी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपसभापती प्रफुल्लचंद्र बाईत, देवरुख शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, राष्ट्रवादीचे तालुका संघटक बाळू उर्फ दत्तात्रय ढवळे, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, नगरसेवक यशवंत गोपाळ, नगरसेवक दीपक खेडेकर, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, अनंत जाधव, नितीन भोसले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, अरुण किर्वे, रामू पंदेरे, मोहन हजारे, विकास राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार निकम पुढे म्हणाले, “माझी प्रकृती ठीक नसल्याने मी मुंबईत होतो. त्यामुळे मला तातडीने घटनास्थळी येणे शक्य झाले नाही. मात्र, कोणत्याही दुर्घटनेच्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचणारा मी असतो. मला जाणीव आहे की, मी तेथे पोहोचणे गरजेचे होते.” असेही त्यांनी सांगितले.
तसेच, उपचारासाठी मुंबईत असतानाही मी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्या संपर्कात राहून प्राथमिक चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणाची रीतसर चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे आमदार शेखर निकम म्हणाले की, मार्लेश्वर असो, टिकळेश्वर असो किंवा गड-किल्ल्यांचा विषय असो, या सर्व ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार आहे. तसेच, रुत्वी पाटील यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत कशी मिळवून देता येईल, यासाठीही प्रयत्नशील असून, यासंदर्भात तेथील आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
शेवटी आमदार शेखर निकम म्हणाले की, विकासकामांना मंजुरी मिळवून ती प्रत्यक्षात आणणे हे आपण समजतो तितके निश्चितच सोपे नसते. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, संबंधित विभागांशी समन्वय आणि वेळोवेळी केलेला पाठपुरावा अत्यंत आवश्यक असतो. या सर्व बाबींचा योग्य समन्वय साधून जास्तीत जास्त विकासकामे जनतेसाठी आणण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
