लांजा : लांजा शहरातील रस्त्यांवर मोकाटपणे फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा लक्षात घेऊन लांजा नगरपंचायतीने पकडलेली मोकाट जनावरे संबंधित जनावर मालकांनी तीन दिवसांच्या मुदतीत दंड भरून ताब्यात न घेतल्याने अखेर ११ मोकाट जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली.या पुर्वी नगरपंचायतीने २५ गुरे चिपळूण येथील गो शाळेत पाटवलेली होती.

लांजा नगरपंचायतीमार्फत रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे पकडून ती बहुउद्देशीय सभागृह येथे ठेवण्यात आली होती. त्यानंतर संबंधित जनावर मालकांनी नगरपंचायतीकडे नियमानुसार दंड भरून आपापली जनावरे परत घेऊन जावीत, यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती.

मात्र, देण्यात आलेली मुदत संपल्यानंतरही संबंधित मालकांनी जनावरे ताब्यात न घेतल्याने अखेर नगरपंचायतीने पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवार २५ ऑगस्ट रोजी ११ मोकाट जनावरे खेड येथील गोशाळेत पाठविण्यात आली.

लांजा शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नगरपंचायतीकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.