मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत देखील गुणांकन पॅटर्न फुटीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेतून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मेहबूब शेख बोलताना म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील गुणांकन पॅटर्न लीक झाले आहे. MPSCनेही गुणांकन पॅटर्न फुटल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अहवाल शासनाकडे पाठविल्याचे वृत्त आहे. MPSCच्या पारदर्शकतेवर रोज प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत जवळपास ९०० विद्यार्थी होते. या परीक्षेचा पॅटर्न व्हॉट्सअॅपवर लीक झाला. याबाबत MPSCकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र पॅटर्न लीक करणाऱ्यांवर गुन्हा का? दाखल करण्यात आला नाही, असे महबूब शेख म्हणाले.
मेहबूब शेख म्हणाले की, एका विद्यार्थिनीला पहिल्या पेपरमध्ये ८१, तर दुसऱ्या पेपरमध्ये ४५ गुण, इतर उमेदवारांच्या गुणांच्या तुलनेत हा निकाल हे संशयास्पद आहे, मात्र, या गुणांमागील कारणांबाबत अधिकृत चौकशी किंवा निष्कर्ष समोर आलेला नाही. MPSCच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होत आहेत ,व्हॉट्सअॅप ग्रुपमधील संभाषणां आहे,अमित सरांमुळे मी PSI झालो’, असे एक विद्यार्थी जाहीरपणे सांगत आहे. मैदानी चाचणीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना तीन वेळा संधी देण्यात आली. सेटिंग लावून गेलेले विद्यार्थी आज नोकरी करत आहेत,असे मेहबूब शेख यांनी सांगितले आहे.
मेहबूब शेख यांना मनोज जरांगे यांच्या उपोषणावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, यापूर्वी नऊ-दहा वेळा सरकारने उपोषण सोडवले आहे. आता पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. उपोषण सोडताना सरकार एक सांगते आणि नंतर वेगळी भूमिका घेते. किती काळ दोन समाजांना आमनेसामने आणणार? असा प्रश्न मेहबूब शेख यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना मेहबूब शेख म्हणाले की, सामान्य लोकांच्या खिशावर दरोडा कसा टाकायचा, हे या सरकारकडून शिकले पाहिजे. आधी ऑनलाइन पेमेंट करा म्हणून प्रोत्साहन द्यायचे आणि नंतर त्याच पेमेंटवर शुल्क आणि GST आकारायचा, असेही मेहबूब शेख यांनी बोलताना सांगितले आहे.